प्रजातींचे नाव – सिमल
शास्त्रीय नाव – सिबा पेंटेण्ड्रा (Ceiba pentandra)
सामान्य नाव – कपोक, रेशमी कापसाचे झाड, पांढरे सिमल
स्थूल – बॉम्बेकेसी (Bombacaceae)
स्थान,आढळ – सिमल वृक्ष ही भारत, इंडोनेशिया आणि अमेरिकेतील मूळ वनस्पती आहे आणि बहुतेक दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळते. मात्र, पश्चिम आणि दक्षिण भारतातील उष्ण प्रदेशातही याची लागवड करता येते. हे झाड 15 ते 20 अंश उत्तर ते 15-20 अंश दक्षिण क्षेत्राच्या सदाहरित वनात आढळते.
उपयुक्त हवामान – या झाडास सुर्यप्रकाश आवश्यक असून दुष्काळ सहनशील आणि काहीसे दंव आणि आग प्रतिरोधक आहे. हे अशा भागात होते जेथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 750-3000 मिमी पर्यंत असते आणि कोरडा हंगाम 4 महिन्यांपेक्षा जास्त नसतो. त्याच्या वाढीदरम्यान पुरेसा पाऊस आवश्यक असतो आणि फुलोऱ्याच्या वेळी आणि शेंगा पिकण्यापर्यंत कोरडे वातावरण आवश्यक असते. त्याची वाढ गाळाच्या जमिनीत जास्त चांगली होते. हा वृक्ष जेथे जमिनीची खोली जास्त आहे किंवा पाण्याचा कमी निचरा असलेल्या जमिनीत लावता येतो.






रोपवाटीका तंत्रज्ञान
बियाणे – या पद्धतीत बिया फळांपासून वेगळ्या केल्या जातात आणि 4 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 60% आर्द्रतेत बिया 1 वर्षापर्यंत साठवल्या जाऊ शकतात. त्याच्या ताज्या बियांची उगवण टक्केवारी 90-100 टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली आहे. वालुकामय जमीन आणि 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान बीया उगवण करण्यासाठी योग्य मानले जाते. नर्सरीमध्ये वाढलेली रोपे 4-10 महिन्यांच्या वयात शेतात स्थानांतरित केली जाऊ शकतात किंवा शेतातच बियांची लागवड करता येते.
अभिवृध्दी – कटींगद्वारे (Stem cutting) अभिवृध्दीसाठी एक वर्ष जुन्या शाखांची निवड केली जाते. बिया पासून तयार केलेल्या रोपांमध्ये मुळे खोल जातात तर कटिंग्जपासून तयार केलेल्या रोपांमध्ये मुळे कमी खोलीपर्यंत राहतात. सिमलचे 1 वर्ष जुन्या खोडाद्वारे देखील कलम तयार केले जाऊ शकते.
लागवड तंत्र – शेतात सिमल लावण्यापूर्वी त्याची योग्य नांगरणी करून शेत तयार करावे.त्यानंतर 7 मीटर x 7 मीटर अंतरावर 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचे खड्डे तयार करावेत. ते खड्डे माती व कुजलेले शेणखत मिसळून भरावेत आणि पावसाळ्यात 30 ते 60 सेमी उंचीची झाडे लावावीत.आवश्यकतेनुसार पाणी दिले पाहिजे. ज्या भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 मिमी पेक्षा कमी आहे, तेथे उन्हाळयात 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
तण व्यवस्थापन – जरी सिमल रोपांकडे कमी लक्ष देण्याची गरज आहे, तरीही वेळोवेळी शेत तणमुक्त ठेवले पाहिजेत. या झाडाची छाटणी करण्याची गरज नाही, परंतु वेळोवेळी शेतात वाढणारी झुडपे आणि वेली काढून टाकल्या पाहिजेत, त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
उपयुक्त कृषी वानिकी पध्दत – कॉफी आणि कोकोच्या लागवडीत सावली देणारे झाड म्हणूनही सिबा लावले जाते. शेतातील बांधावर 6 मीटर अंतरावर लागवड केली जाते, जेणेकरून शेतातही पिके घेता येतील.
वनस्पती संरक्षण – सिमलला जास्त आर्द्रता असलेल्या भागात पानांचे डाग (leaf spot) डाग, खोड कुजणे (die back) आणि (damping off) व अँथ्रॅक्नोज होण्याची शक्यता असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी कोसाइट (कॉपर हायड्रॉक्साईड) 6.6 ग्रॅम प्रति लिटर आणि इलियट (Aluminium trisethyl phosphite) 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात दिल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
उत्पन्न – सिबा झाड हे ७० सें.मी.च्या व्यासाचे खोड साधारणपणे सरासरी ४ घनमीटर लाकूड देते. त्याचप्रमाणे, 100 सेमी आणि 150 सेमी व्यासाच्या खोड्यांमधून अनुक्रमे 9.3 घनमीटर आणि 23 घनमीटर लाकूड मिळते.साधारणपणे या झाडाला 3 ते 8 वर्षे वयापासून फळे येण्यास सुरुवात होते आणि दरवर्षी एका झाडापासून 330-400 फळे मिळू शकतात, ज्यातून 15 ते 18 किलो कापूस/रेशीम आणि 30 किलो बिया मिळू शकतात.सरासरी 450-700 किलो प्रति हेक्टर फायबर मिळू शकते.
उपयोग-माचिस बॉक्स आणि हलके प्लाय लाकूड कंटेनर बनवण्यासाठी सिबा लाकडाला मोठी मागणी आहे.हे पॅकिंग बॉक्स, सिंगल, ब्रश हँडल इत्यादी बनवण्यासाठी देखील वापरले जाते.यातून मिळणारा (कापूस/रेशीम) पॅकिंग, उशी, इत्यादी बनवण्यासाठी वापरला जातो.त्याच्या सालातून निघणाऱ्या डिंकाला मोचरस म्हणतात, ज्याचा खूप औषधी उपयोग आहे.आतील सालापासून मिळणाऱ्या (कापूस/रेशीम) वापर कॉर्डेज बनवण्यासाठी केला जातो. सिबा कापूस/रेशीमचा वापर गाद्यामध्ये फिलर म्हणून केला जातो.
संपर्क व्यक्ती
भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रिय कृषीवानिकी अनुसंधान संस्थान, झाशी