प्रजातीचे नाव : कडुलिंब

शास्त्रीय नाव – अजेडिरेक्टा इंडिका (Azadirachta indica)

सामान्य नाव : कडुनिंब

कुळ : मिलियेसी  (Meliaceae)

संभावित क्षेत्र : भारतात कडुनिंब सर्व प्रकारच्या वातावरणात आढळून येतो. दक्षिणेस केरळपासून उत्तरेत हिमालयात तसेच शुष्क वातावरणापासून दमट वातावरण व उष्ण वातावरणापासून समशीतोष्ण वातावरणात कडुलिंब उगवतो. परंतु भारतात मुख्यत्वे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश तसेच तमिळनाडू राज्यात जास्त प्रमाणात आढळतो.

उपयुक्त हवामान : कडुनिंब वृक्षामध्ये कोरडया वातावरणात राहण्याची विलक्षण क्षमता दिसून येते. सामान्यत: कडुलिंब ४०० मिली मिटर ते १२०० मिली मिटर पर्जन्यक्षेत्रात आर्द्र शुष्क तसेच उप आर्द्र क्षेत्रात आढळतो. सर्व प्रकारच्या माती मध्ये जसे की खोल, सपाट, वालुकामय, चिकनमातीमध्ये वृक्षाची वाढ उपयुक्त मानली जाते. परंतु खूप कमी तापमान व दलदल कडुनिंब वृक्षाच्या वाढीसाठी हानिकारक ठरते. ज्या मातीमध्ये खालचा स्तर कॅल्शीयमचा असेल किंवा कठोर चिकनमातीचा असेल त्याही ठिकाणी कडुलिंब वृक्षाची वाढ सहज होते. कडुलिंब वृक्षाच्या वाढीसाठी जमिनीचा पीएच ६.२ किंवा त्यापेक्षा अधिक चांगला मानला जातो.

रोपवाटीका तंत्रज्ञान

बीयांद्वारे : कडुलिंब वृक्षाचे बिया जमा करण्यासाठी त्याचे निळे-हिरवे रंगाचे पिकलेली फळे जमा करावी लागतात. तदनंतर रोपवाटीकेत गादीवाफे तयार करुन त्यावर ५ से.मी.च्या अंतरावर व ५.५ से.मी. खोलीवर बी लावावे . बी लावल्यानंतर त्यावर मातीचा एक थर टाकला जातो जेणेकरुन किटकांद्वारे व पानांद्वारे होणारे नुकसान टळते. या व्यतिरिक्त पिशवितही रोपे लावले जाऊ शकतात. सामान्यत: बियांणा १० ते १५ दिवसांत  अंकूर येतात. बी लावण्यासाठी   शेतामध्ये ५०% वालुकामय चिकनमाती ४०% नदीची वाळू व १० % शेणखत याचे मिश्रण टाकावे. जर रोपे प्लास्टिक पिशवीत तयार करावयाची असतील तर त्यात गाळ, वाळू, चिकनमाती व शेणखत  याचे 1:1:1:1 असे प्रमाणाचे मिश्रण घ्यावे.

फांद्यांद्वारे अभिवृध्दी : कडुलिंबाचे वृक्ष तयार करण्यासाठी एक वर्षाच्या फांद्या (डहाळया) निवडून त्यातील १५-२० से.मी. लांबी व १ से.मी . व्यास असलेली कडक फांदी तोडतात. त्यानंतर कापलेल्या फांदीच्या खालच्या भागात १००० पी.एम. इण्डोल ब्यूटायरिक एसिड (आय.बी.ए.) मध्ये भिजवले जाते व फांदीस गादीवाफ्यांवर ५० ते ६० % सावलीत लावले जाते. आय.बी.ए. च्या मिश्रणात बुडवल्यामुळे कडक कलमांना लवकर मुळे फुटण्यास मदत होते.

लागवड तंत्रज्ञान : कडुलिंब वृक्षाची रोपे शेतात लावण्याअगोदर शेताची व्यवस्थित नांगरणी करणे आवश्यक आहे. शेतात लावण्यासाठी ४-५ महिन्याचे (१५ ते ५५.५ से.मी. उंचीचे) रोपे निवडली पाहिजे. रोपे लावण्यापूर्वी शेतात ५ x ५ मी अंतरावर (४०० रोपे प्रति हे.) ३०x३०x३० से.मी. आकारात खड्डे खोदावे. शेतात खड्डे खोदण्याचे काम मे महिन्यातच पूर्ण झाले पाहिजे. रोपे लावल्यानंतर ७-१० दिवसाच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे.

तण व्यवस्थापन :

निंदणी व खुरपणी : तण यंत्रणासाठी पहिल्यावर्षी २-३ वेळा नांगराने अथवा ट्रॅक्टरने शेत नांगरले पाहिजे. नंतर प्रत्येक वर्षी पावसाळयानंतर तसेच त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही खुरपणी करणे आवश्यक आहे.

खत : रोपवाटीकेतून रोपे शेतात लावण्यापूर्वी प्रति खड्डा ५-६ कि.ग्रॅ. शेणखत, १० ग्रॅ. युरिया, २० ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट, ५० ग्रॅ. म्यूरेट ऑफ पोटॅश, १-५ कि.ग्रॅ. कडूनिम पेंड तसेच २०-२५ ग्रॅ. एंडोसल्फॉन पावडर हे मिश्रण टाकावे. तसेच हेच खताचे प्रमाण २ वर्षांपर्यंत देत राहावे. जर वृक्षांवर किटकांचे संक्रमण झाल्यास ०.२५% मॅलिथिऑन किंवा ०.०२% डेमोक्रॉन मिश्रण फवारावे.

कापणी : कडुलिंब वृक्षामध्ये कापणी करणे हे त्याच्या अंतिम उपयोगाद्वारे ठरविले जाते. जर इमारती लाकडासाठी वापर करायचा असेल तर २-३ वर्षातून एकदा कापणी करावी.

विरळीकरण : कडुलिंबाचे वृक्ष जेव्हा ३-४ वर्षांचे होतात तेव्हा एकदा विरळीकरण करणे आवश्यक आहे. तसेच ६ वर्षानंतर दुसऱ्यांदा विरळीकरण करावे त्यानंतर झाडांची वाढ, जमिनीची गुणवत्ता या आधारे विरळीकरण ठरवावे.

उपयुक्त कृषी वानिकी पध्दत : आर्थिक मूल्याच्या आधारावर कृषी वनीकरण व्यवस्थेत कडुलिंबाचा योग्य वृक्ष म्हणूनही विचार करण्यात आला आहे. भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन संस्था, झाशी यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, कडुलिंबासह इतर झाडे हेक्टरी ८.५ टन उत्पादन (बायोमास) देऊ शकतात. इतर संशोधनात, थारच्या वाळवंटासारख्या कोरड्या भागात कडुनिंब आणि इतर झाडांसह चारा वाढवून जमिनीची उत्पादन क्षमता ०.५ टन/हेक्टर वरून ३.६ टन/हेक्‍टरीपर्यंत वाढल्याचेही नोंदवले गेले. भुईमूग, मोहरी, हरभरा, चवळी, हरभरा, सोयाबीन इत्यादी तेलबिया आणि कडधान्य पिकांची पहिली 4-5 वर्षे कडुलिंबाच्या ओळींमध्ये यशस्वीपणे लागवड करता येते. आंतरपीक केवळ अतिरिक्त उत्पन्नच वाढवत नाही तर पहिली ४-५ वर्षे झाडांची देखभाल करण्यासही मदत करते.

वनस्पती संरक्षण : कडुलिंबाला रोपांच्या अवस्थेत बोरर (Tip borer) आणि डास बग (Tea mosquito bug) यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो. जेव्हा झाडे परिपक्व होतात तेव्हा स्केल कीटक (Scale borer)आणि ब्लॅक टी थ्रीप्स (black tree thrips)हे मुख्य कीटक असतात. खोड कुजणे, राईझोक्टोलिया, लीफ नेट ब्लाइट, लीफ स्पॉट, ब्लाइट इत्यादी रोग रोपांच्या अवस्थेत आढळतात. कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास योग्य कीटकनाशके फवारणी करून त्याचे नियंत्रण करावे.

उत्पन्न : कडुनिंब फळ लंबवर्तुळाकार (5 सेमी x 1 सेमी) असून त्याच्या साली आणि बियांमध्ये राळ सारखा पदार्थ असतो. प्रत्येक बियामध्ये एक कर्नल असते ज्याचे सरासरी वजन 0.2 ग्रॅम असते, जे बियांच्या वजनाच्या 50-60 टक्के आणि फळाच्या वजनाच्या 55 टक्के असते. कडुनिंबाच्या कर्नलमध्ये 30 ते 50 टक्के चरबी असते. कडुलिंबाची झाडे 3-5 वर्षांच्या वयात फळ देण्यास सुरुवात करतात आणि 10-12 वर्षांची वृक्ष फळ देणारी झाडे बनतात. सुरुवातीच्या काळात प्रति झाड 10-25 किलोपर्यंत फळांचे उत्पादन होते, झाड परिपक्व झाल्यावर प्रति झाड प्रति वर्ष 30-100 किलोपर्यंत बियाणे मिळतात. दहा वर्षांचे झाड अंदाजे ५-६ घनफूट लाकूड देऊ शकते.

उपयोग : कडुनिंब हे बहुउद्देशीय वृक्ष आहे. याच्या फांद्या दात (घासण्यासाठी दातून) म्हणून वापरतात आणि कडुनिंबाचा उपयोग अनेक प्रकारचे वेदनाशामक आणि कीटकनाशके बनवण्यासाठी केला जातो. याचा वापर साबण, तेल आणि वंगण बनवण्यासाठीही होतो. कडुनिंबाच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, सामान, बोटी बनवणे, खेळणी बनवणे, शेतीची अवजारे बनवणे इत्यादीसाठी होतो. त्याची पाने शेळ्या-मेंढ्यांना आणि गायी-म्हशींना चारा म्हणूनही दिली जातात.

संपर्क व्यक्ती : भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कृषी वानिकी संशोधन संस्था, झाशी

अखिल भारतीय कृषी वनीकरणावरील एकात्मिक प्रकल्प (AICRPAF) – चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार, हरियाणा