प्रजातींचे नाव – अर्जुन
शास्त्रीय नाव – टर्मिनिलिया अर्जुना (Terminalia arjuna)
सामान्य नाव – अर्जुन
कूळ – कॉम्बरेटेसी (Combretaceae)
संभाव्य क्षेत्र -अर्जुन ही भारतीय उपखंडातील देशी वनस्पती मानली जाते.हे झाड 1200 मीटर उंचीपर्यंत दऱ्या आणि मैदानी भागात आढळते. भारतात ही झाडाची प्रजाती बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा येथे आढळते. मात्र, ही प्रजाती महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही लावता येते. हे झाड नद्या आणि कालव्याच्या काठावर, गाळाच्या जमिनीत, इत्यादी ठिकाणी चांगले वाढू शकते.
योग्य हवामान – हे झाड 20 ते 25 मीटर उंच असून सदाहरित राहते आणि हे झाडाच्या फांद्या खाली वाकणाया (drooping) व पसरट असतात. हे झाड नैसर्गिकरित्या उप-उष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते जेथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 750-1900 मिमी आणि सरासरी तापमान 20-300 अंश सेल्सिअस असते. झाड माफक प्रमाणात सावली सहनशील (Sensetive) आहे परंतु दुष्काळ आणि दंव यांच्यासाठी अधिक संवेदनशील आहे, परंतु अर्जुनाच्या झाडाची कॉपीसिंग (Coppicing) करण्याची क्षमता चांगली आहे. अर्जुनासाठी साधारणपणे इष्टतम pH मूल्य (6.5- 7.0) योग्य असते आणि ते गाळ किंवा काळ्या मातीतही वाढतात. हे ओलसर, सुपीक आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते, ते क्षारयुक्त, क्षारीय आणि पाणी साचलेल्या भागात देखील वाढू शकते.





रोपवाटीका तंत्रज्ञान – बियाणे, स्टंप आणि टिश्यू कल्चर तंत्राद्वारे अर्जुनाचे रोपे केली जाऊ शकतात.
बियाणे – अर्जुनाची पिकलेली फळे एप्रिल-मे महिन्यात गोळा केली जातात आणि एक किलोमध्ये सुमारे 775 ते 800 बिया असतात. बियांच्या वरची आवरण हाताने किंवा यांत्रिक पद्धतीने काढावे. त्यानंतर बिया 48 तास थंड पाण्यात भिजवल्यानंतर पेरल्या जातात ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतात. पेरणीसाठी फेब्रुवारी-मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. बियाणे थेट पॉलिथिन पिशव्यामध्ये किंवा चांगल्या प्रकारे तयार केलेल्या रोपवाटिकेत पेरता येते. बियांची उगवण 7 दिवसांनी सुरू होते आणि 60 दिवस चालू राहते. यामध्ये ९० टक्क्यांपर्यंत उगवण होते. रोपवाटिकेमध्ये 3 ते 4महिने रोपे ठेवावीत आणि 45 सें.मी.ची उंची झाल्यावर ती शेतात लावण्यासाठी तयार समजली जातात.
अभिवृध्दी – अर्जुनाचा स्टंप कटिंग्ज आणि (air layering) द्वारे प्रवर्धन केले जाते. 15 महिन्यांच्या रोपांपासून स्टंप तयार केले जातात. स्टंप लावण्यासाठी 1.2 ते 2.5 सेमी व्यासाची फांदी योग्य मानली जाते. ते प्रथम रोपवाटिकेत पॉलिथिन पिशव्यामध्ये लावतात आणि तीन ते चार महिने ठेवल्यानंतर शेतात पुनर्लावणी करावी. अर्जुनाचा स्टंप कटिंग्जद्वारे प्रवर्धन केले जाते, ज्यामध्ये 500 ते 2000 पीपीएम पर्यंतच्या आयबीए द्रावणाने कटिंग्जवर उपचार केले जातात, ज्यामुळे लवकर रूटिंग होते. कटिंग्स व्यतिरिक्त, टिश्यू कल्चर तंत्र देखील वापर करतात. परंतु जास्त किंमतीमुळे सामान्य परिस्थितीत याची शिफारस केली जात नाही.
लागवड तंत्र – शेतात लागवड करण्यापूर्वी शेताची चांगली नांगरणी करून सपाटीकरण करावे, त्यानंतर 6 मीटर x 6 मीटर किंवा योग्य अंतरावर 45 सेमी x 45 सेमी x 45 आकाराचे खड्डे खणावेत. ते खड्डे सुमारे 10 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरले जातात आणि प्रत्येक खड्ड्यात 75:50:30 नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश मिसळले जातात. खड्डे भरल्यानंतर पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये सुमारे 1 वर्षाचे रोपटे लावले जातात. टसर रेशीम उत्पादनासाठी अर्जुनची लागवड 2 मीटर x 3 मीटर किंवा 3 मीटर x 3 मीटरवर करावी. कृषी-वनीकरण पद्धतीमध्ये, ओळ ते ओळ अंतर 5 मीटर किंवा 6 मीटर ठेवावे जेणेकरुन त्या दरम्यान इतर पिकांची लागवड करता येईल.
तण व्यवस्थापन
खुरपणी – शेतात लागवड केल्यानंतर 1 वर्ष शेत तणमुक्त ठेवावे, जरी आंतरपीक पद्धतीने घेतलेल्या वार्षिक पिकांमध्ये केलेल्या व्यवस्थापनामुळे तणांनाही प्रतिबंध करता येतो.
रोपांची छाटणी – अर्जुनाच्या झाडामध्ये कमकुवत फांद्या किंवा मृत फांद्या असतील तेव्हा त्यांची छाटणी करून वेळोवेळी काढून टाकावी जेणेकरून कोणताही रोग किंवा समस्या उद्भवणार नाही.
लोपिंग (lopping) – चाऱ्यासाठी अर्जुनच्या झाडामध्ये लोपिंग केले जाते. डोंगराळ भागात अर्जुन हे अत्यंत महत्त्वाचे चारा वृक्ष मानले जाते. या भागात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लोपिंग केले जाते जेणेकरून जनावरांना चांगल्या पोषक तत्वांसह चारा मिळू शकेल.
पोलार्डिंग (pollarding) – अर्जुनामध्ये दरवर्षी नवीन कोंब आणि पाने मिळविण्यासाठी आणि रेशीम किड्यांचे संगोपन सुलभ करण्यासाठी पोलार्डिंग केले जाते. पोलार्डिंग कमाल उंची सुमारे 2.43-2.74 मीटर झाल्यावर करतात.
उपयुक्त कृषी वानिकी पध्दत – अर्जुन वृक्षाची लागवड शेतकऱ्यांनी कृषी वनीकरण पद्धतीने त्यासोबत नारळ आणि लिंबूवर्गीय फळांची लागवड केली जाते. कॉफीच्या मळ्यातही अर्जुनाची सावली देणारे झाड म्हणून लागवड केली जाते.टसर रेशीम कीटकांच्या संगोपनातही अर्जुनाचा वापर केला जातो.अर्जुनला भारतातील टसर रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी 1 मी. x 2 मी अंतरावर लागवड आणि पोलार्डिंग वेळोवेळी केले जाते. हे प्रति हेक्टर सुमारे 30,000 झाडांच्या घनतेमध्ये लागवड केली जाते जेणेकरून जास्तीत जास्त बायोमास तयार करता येईल.
मध्य भारतातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर अर्जुनाची लागवड केली आहे. अर्जुन आधारित कृषी वनीकरण प्रणाली देखील मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी स्वीकारली आहे. याशिवाय इतर कृषी-वनीकरण पद्धतींमध्येही अर्जुन वृक्षाचा समावेश होतो.अर्जुन वृक्षाची लागवड कडधान्य पिके आणि नगदी पिकामध्ये देखील करता येते. जेणेकरून उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करता येईल.
वनस्पती संरक्षण – पावसाळ्यात सुरुवातीच्या अवस्थेत पावडर बुरशी (powdery mildew) अधिक होते या रोगावर नियंत्रण सल्फर ०.१ कॅराथेन इत्यादी बुरशीनाशकांच्या फवारणीद्वारे रोगांवर नियंत्रित केले जाते. काही पाने खाणारे कीटकही (leaf eating insects) येतात. Gall insect (Trioza fletcheri minor) पानांना नुकसान पोहचवतो. या किटकाच्या नियंत्रणाकरिता 2 वेळा खोल नांगरणी करुन त्याचे अंडी, अळया, किटक जमा करुन नष्ट करावे. नीम केक जमिनीत टाकून Azadirachtin (6ppm) पानांवर फवारावे. कडुनिंबावर आधारित कीटकनाशके वापरणे योग्य ठरेल.
उत्पन्न – अर्जुनाच्या झाडाची साल हिवाळ्यात नियमितपणे काढली जाते. झाडाची साल 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या झाडांपासून घेतली जाते. अर्जुनाची साल सुमारे 5 सेमी रुंद x 25 सेमी लांब व भुसभुशीत असते. सुमारे 1 हेक्टरपासून 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची झाडे दरवर्षी 500 किलो कोरडी साल देतात. संशोधनात असे आढळून आले की 4 वर्षांच्या वयात प्रति हेक्टर 30000 झाडे ठेवल्यास जास्तीत जास्त 22.7 टन बायोमास तयार करता येतो.
उपयोग – त्याचे लाकूड शेतीची अवजारे बनवण्यासाठी, बोटी आणि इतर उपकरणे बनवण्यासाठी वापरले जाते. हे सरपण म्हणूनही वापरले जाते. त्याच्या लाकडाचे उष्मांक मूल्य ५०३० किलो कॅलरी प्रति किलो (सॅपवुड) आणि ५१२८ किलो कॅलरी प्रति किलो (हार्टवुड) आहे. तो चांगल्या प्रतीचा कोळसा बनवतो आणि सरपण म्हणूनही वापरला जातो. याच्या सालात 22 ते 24 टक्के टॅनिंन (tannine) असते आणि फळांमध्ये 7 ते 20 टक्के टॅनिंन असते, जे टॅनिंन रंग देण्यासाठी उपयुक्त आहे.
अर्जुनाचा मुख्य उपयोग रेशीम किटक संगोपनात होतो. या झाडाची पाने टसर रेशीम किड्यांसाठी स्वादिष्ट अन्न म्हणून काम करतात. याशिवाय, त्याच्या सालाचा एक औषधी उपयोग देखील आहे, जो हृदयाशी संबंधित विविध रोग आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे.
संपर्क व्यक्ती – केंद्रीय टसर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, केंद्रीय रेशीम मंडळ, पिस्का नगरी, रांची-835303, झारखंड