प्रजातींचे नाव – अरडू, महारुख, महानीम

शास्त्रीय नाव – ऐलऐन्थस एक्सेल्सा (Alianthus excelsa)

सामान्य नाव – अरडू, महारुख, महानीम, स्वर्गातील झाड

कूळ – सिमारुबेसी (Simarubiaceae)

स्थान,आढळ – महारुख हे भारतीय उपखंडातील मानले जाते आणि ते भारतातील सर्व उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेशात महारुख अधिक प्रमाणात आढळतो.

उपयुक्त हवामान – महारुख हे अतिशय हलके प्रकाश आवश्यक असणारे झाड आहे. त्याची 400 मि.मी. पर्जन्यमान व शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढ चांगली होते. यात 0 ते 47 अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची क्षमता आहे, परंतु ते दुष्काळ आणि दंव यांच्यासाठी संवेदनशील आहे, तसेच जास्त पाऊस त्याच्यासाठी फायदेशीर नाही. महानीम, महारुखची लागवड वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीतही करता येते परंतु हलकी वालुकामय, चिकणमाती माती त्याच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानली जाते. उथळ जमिनीत त्याची वाढ चांगली होत नाही.

रोपवाटीका तंत्रज्ञान

बियाणे – बियाण्याद्वारे लागवड करताना महारुखच्या ताज्या बिया उंच गादीवाफ्यांवर पेरल्या जातात. 20 से.मी. अंतरावर 5-7 मि.मी खोल पेरणी करावी आणि हलकी मातीने झाकलेली असावी. बियाणे उगवण सुमारे 10-12 दिवसात सुरू होते आणि सुमारे 50 दिवसात पूर्ण होते. रोपाने 12-15 सें.मी. उंची गाठल्यानंतर ते पॉलिथिन पिशव्यांमध्ये स्थानांतरित केले जातात.

अभिवृध्दी – महारुखची लागवड कलम, कटिंग व ग्राफ्टिंग अशा पद्धतीने करता येतो.

कटिंग – पॉलिथिनच्या पिशव्यामध्ये तयार केलेल्या कटींगला मुळे आल्यानंतर लागवडीसाठी वापरता येते. याशिवाय 2- 3 सें मी व्यासाचे एक वर्ष जुने रूट-स्टेम कटिंग देखील लावले जाऊ शकते. परंतु स्टेम कटिंग (स्टंप) मध्ये यश फक्त 50 टक्के एवढेच आहे.

कलम करणे – जोधपूरच्या अॅरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने(Arid Forest Research Institute)  परिपक्व महानीम/ महारुखच्या झाडामध्ये ग्राफ्टींग (Grafting) करण्याचे तंत्र विकसित केले आहे. 7 ते 10 वर्षे जुन्या झाडापासून एक वर्षाचे रोपटे कलमासाठी निवडावे आणि त्यावर पाचर किंवा पॅच ग्राफ्टिंग दोन महिन्यांच्या फांद्या ज्या घेतल्या जातात. हे काम फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान करणे उत्तम मानले जाते. तथापि, पॅच ग्राफ्टिंगपेक्षा वेज ग्राफ्टिंग अधिक यशस्वी आहे.

लागवड तंत्र – लागवडीपूर्वी शेत चांगले तयार करावे. त्यानंतर 45 सें.मी. x 45 सेमी x  45 सेमी किंवा 30 x 30 x 30 आकाराचे खड्डे खणले पाहिजेत. खड्डे खोदून ते कुजलेल्या शेणाने भरण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावे. पावसाळा सुरू झाल्यावर 6-12 महिने वयाची रोपे योग्य अंतरावर खड्ड्यात लावावीत. दाट लागवड पध्दतीने 3 मी. x 3 मी किंवा 5 मी. x 5 मी करावी  परंतु कृषी वनीकरणमध्ये महारुख  झाडे  5मी. x 5 मी किंवा 6.5 मी. किंवा 8 मी. x 5 मी अंतरावर लावले पाहिजे.

तण व्यवस्थापन

खुरपणी – सुरुवातीच्या काळात तणांचा महारुख झाडांवर खुपरणीचा खूप परिणाम होतो. त्यामुळे सुरुवातीची दोन वर्षे शेत तणमुक्त ठेवावे. पहिल्या वर्षी तीन वेळा (जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर) आणि दुसऱ्या वर्षी एकदा निंदणी व खुरपणी करणे गरजेचे आहे.

लॉपिंग (lopping) – पानांपासून चारा मिळवणे हा महारुखची कोरडवाहू आणि अर्ध-शुष्क भागात लागवड करण्याचा मुख्य उद्देश आहे. लॉपिंगमुळे झाडाच्या फांद्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून झाडाच्या वरच्या भागातील दोन-तृतियांश फांद्या लॉपिंग करणे सर्वात योग्य मानले जाते. चौथ्या वर्षापासून लॉपिंग सुरू करता येते आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत लूपिंग करता येते.

रोपांची छाटणी – जेव्हा माचिस किंवा खेळणी उद्योगासाठी महारुखची लागवड केली जाते, तेव्हा गाठीमुक्त लाकडासाठी वेळोवळी छाटणी करणे आवश्यक असते.

विरळीकरण – साधारणपणे दाट लागवड पद्धतीमध्ये विरळीकरण केले जाते. लागवडीच्या चौथ्या वर्षी, जेव्हा झाडांची उंची 6-8 मीटर असते. जेव्हा ते पोहोचते तेव्हा विरळीकरण करणे आवश्यक आहे.

उपयुक्‍त कृषी वानिकी पध्‍दत– महारुख हे जलद वाढणारे चारा पानांचे झाड आहे, ज्याच्या सोबत पिके किंवा चारा पीके सहज घेता येतात. कृषी वनीकी पद्धतीमध्ये प्रति हेक्‍टरी 100, महारुखची लागवड करण्याची शिफारस केली जाते, जेणेकरून पीक उत्पादनावर परिणाम होणार नाही आणि झाडांपासून पुरेसा चाराही मिळू शकेल. प्रामुख्याने गहू, बाजरी, बार्ली, मोहरी, कडधान्ये आणि गवार या पिकांची लागवड महारुख सोबत केली जाते. शेताच्या उत्तर-पश्चिमेकडील सीमेवर महारुखची लागवड केली जाते, जेणेकरून पिकांचे जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करता येईल. वन कुरण पद्धतीत अंजन, धामण, पॅनिकम अँटीडोटेल इत्यादी गवतांची महारुख सोबत लागवड केली जाते. साधारणपणे बिगर बागायती जमिनीत अंजन गवत इतर गवतांपेक्षा जास्त उत्पादन देते.

वनस्पती संरक्षण – रोपवाटिकेत तयार करताना मुळे कुजणे, खोड कुजणे यासारखे बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी रोपवाटिका योग्य ठिकाणी करावी आणि ओलाव्याचे प्रमाणही योग्य असावे. कीटकांचा प्रादुर्भाव असताना कीटकनाशकाची (BHC) फवारणी करणे अत्यंत आवश्यक असते. महारुखमध्ये वेब वर्म (web worm,web maker-Atteva fabriciella) किडीमुळे खूप नुकसान होते, जे 0.1 टक्के मॅलेथिऑनने नियंत्रित केले जाऊ शकते. याशिवाय जमिनीत (bore –batocera rufomaculata) अळीही येते, ती खड्डयात रॉकेल टाकून नियंत्रित करता येते. Atteva niveigutta आणि Eligma narcissus यांसारखे महारुखचे पाने खाणारे  कीटक  नुकसान करतात. त्यांच्या नियंत्रणासाठी सेविन (०.०१-०.०२ टक्के) किंवा सुमी सिडीन (०.०१-०.०२ टक्के) फवारणी करावी.

उत्पन्न – महानीम/ महारुखचे उत्पादन चक्र साधारणपणे 20 वर्षे असते, ज्यामध्ये त्याच्या खोडाचा व्यास 20 सेमी अथवा जास्त असतो. तामिळनाडूमध्ये, प्रति हेक्टर उत्पादन बिगर सिंचन स्थितीत 50-75 टन होते आणि सिंचन स्थितीत ते 120-135 टन/हेक्टर पर्यंत वाढते. महानीम, महारुखचे झाड 5, 10 आणि 20 वर्षे वयाच्या अनुक्रमे 100, 200 आणि 400 किलो/झाडाचे सरासरी चारा उत्पादन देते.

उपयोग – महानीम, महारुखच्या लाकडाची घनता कमी असल्याने बोट बनवणे, सजावट करणे, खेळणी उद्योग, आगपेटी उद्योग इत्यादींमध्ये त्याचे लाकूड वापरले जाते.

संपर्क व्यक्ती – ऑल इंडिया इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सेंटर फॉर ऍग्रो फॉरेस्ट्री, चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसार-125003

भारतीय कृषी संशोधन परिषद -सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर, राजस्थान

वन संशोधन संस्था, जोधपूर, राजस्थान.